विजयी उपनेता न्यूज 27/12025
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी विधानसभानिहाय उमेदवारांचा आढावा घेतला असून, उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. २८) प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी हि माहिती दिली.
आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले, दोन दिवसात उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी आम्ही प्रदेश कार्यालयाकडे पाठविली आहे . मुंबईत या संदर्भात बैठक झाली. बैठकीला सर्व कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. उमेदवारांचा विधानसभा निहाय आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी निश्चित आहे त्या नावांना अंतिम मान्यता देण्यात आली असली तरीही अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचाच असणार आहे. त्यानुसार प्रदेश आणि कोअर कमिटी याबाबत निर्णय घेईल.
भारतीय जनता पक्ष हा विकासाचे व्हिजन पुढे ठेवून काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे विरोधक कितीही एकत्र आले तरीही त्याचा आमच्या पक्षावर परिणाम होणार नाही . आमच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेळोवेळी न्याय देण्यात येतो हा इतिहास आहे. कुठल्याही परिस्थितीत निष्ठावंत कार्यकर्त्यावर पक्षाकडून अन्याय होत नाही त्यामुळे आमच्या उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरही कोणत्याही प्रभागात नाराजी दिसून येणार नाही. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये येऊन विकासाचे व्हिजन घेऊन कोणी काम करण्यासाठी इच्छुक असेल तर पक्षाकडून त्याचे स्वागतच केले जाते असे देखील आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांना माझा नेहमीच पाठिंबा असतो. कार्यकर्त्यांच्या बळावरच कोणतीही लढाई जिंकली जाते. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतरही निष्ठावंतांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला असे दिसणार नाही. सर्वेक्षणानुसार विजयाची क्षमता असणारे उमेदवार निवडण्यात येणार आहेत ही भाजपची रणनीती आहे. त्यानुसारच पक्षश्रेष्ठींकडून उमेदवार यादी अंतिम करण्यात येत आहे.