विजयी उपनेता न्यूज – प्रतिनिधी पुणे 20/ 05/ 2023 सुभाष विद्यालय बहुळ ता.खेड, जि. पुणे येथील शैक्षणिक वर्ष १९९५-९६ च्या दहावी बॅचचा स्नेहमेळावा तब्बल २७ वर्षांनी रविवार दि.१४ मे 2023 रोजी पार पडला. ह्या स्नेहमेळाव्यासाठी ४० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. शालेय जीवनाची आठवण म्हणून हा कार्यक्रम शालेय दिनचर्येनुसार पार पडला. सर्वप्रथम संभाजीमहाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व सर्व उपस्थित गुरुजन श्री.मटाले सर, श्री. गलांडे सर, श्री.कानवडे सर, श्री.गाडेकर सर व श्री.सातपुते सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वर्गशिक्षक श्री. कानवडे सर यांच्या अध्यक्षतेखाली पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली.
राष्ट्रगीत व प्रार्थना गायनाने वर्गाची सुरवात झाली व सर्व उपस्थित विद्यार्थी पुन्हा एकदा लहान होऊन 10 वीच्या बाकांवर जाऊन बसले. श्री. कानवडे सर ह्यांनी हजेरी पत्रकानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरी घेतली व सर्व विद्यार्थ्यांनी२७ वर्षांपूर्वीची जशी सवय होती त्या प्रमाणे हजेरी दिली. सर्व शिक्षक व विद्यार्थी ह्यांना महाराष्ट्रीयन फेटे बांधून समूह फोटो घेण्यात आला. तद्नंतर सर्वांचे स्वागत व गुरुजनांचा छोटेखानी सन्मान करण्यात आला. जगभरात ‘मदर्स डे’ म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधून ज्ञानदात्या गुरुमाऊलींचे सर्व उपस्थित विद्यार्थिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आले. त्या नंतर रोल नंबर नुसार सर्व विद्यार्थ्यांनी आपले परिचय व मनोगत व्यक्त केले. शालेय जीवनातील जुने किस्से व आठवणी सांगत प्रत्येकाने वर्गामध्ये रंगत आणली. नंतर सर्व गुरुवर्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी जेव्हा त्यांचा आदर करतात तेव्हा भरून पावलो अशी भावना व्यक्त केली. या बॅचचे विद्यार्थी सामाजिक, सरकारी, शैक्षणिक, शेती, उद्योग, व्यापार, वारकरी संप्रदाय, राजकीय क्षेत्रामध्ये आपले नैपुण्य दाखवत समाजविकासात जे भरीव योगदान देत आहेत त्याबद्दल गुरुजन वर्गाने समाधान वक्त केले. तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मुलांना उच्चशिक्षित करावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.;या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच उज्वला गोकुळे व शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या अर्चना साबळे ह्यांनी केले. आभार क्लास वन ऑफिसर असेलेले राहुल गवारे यांनी मानले.
कार्यक्रम सफल करण्यासाठी बाप्पुसाहेब शिंदे, पांडुरंग अण्णा निकम, हिरामण काटकर,संदिप भाऊ साबळे ह्यांनी विशेष नियोजन केले त्याबद्दल त्यांचेही सर्वांनी आभार मानले. दरवर्षी असा वर्ग भरत जावा अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यात आली.
मैत्रीचा हा ऋणानुबंध कायम यासाठी पुढील वर्षी सर्वांनी सहकुटुंब भेटायचे असे ठरवूनच एकमेकांचा निरोप घेतला.