Homeपिंपरी - चिंचवडप्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी पत्रकारांचा पुढाकार ,सिक्कीम येथे अभ्यास दौऱ्याची मागणी, पत्रकाराच्या प्लास्टिक मुक्त राज्य सिक्कीम अभ्यास दौऱ्यास आयुक्ताची तत्वतः मान्यता
प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी पत्रकारांचा पुढाकार ,सिक्कीम येथे अभ्यास दौऱ्याची मागणी, पत्रकाराच्या प्लास्टिक मुक्त राज्य सिक्कीम अभ्यास दौऱ्यास आयुक्ताची तत्वतः मान्यता
विजयी उपनेता न्यूज – पिंपरी प्रतिनिधी, 02/07/2023 भारताची विकासाची यशस्वी घोडदौड सुरू असताना हा विकास शाश्वत आणि सर्वसामवेशी असावा यासाठी देश प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून प्रधानमंत्र्यांनी प्लॅस्टिकमुक्त भारताचे स्वप्न पाहिले आणि सिक्कीम राज्याने याची मुहूर्तमेढ रोवत देशातील पहिले प्लॅस्टिकमुक्त तसेच जगातील पाहिले पूर्णतः जैविक राज्य होण्याचा बहुमान पटकावला. सिक्कीमने प्रतिष्ठित ‘संयुक्त राष्ट्र फ्यूचर पॉलिसी गोल्ड अवार्ड 2018’ देखील मिळवला आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहर प्लॅस्टिक मुक्त व्हावे यासाठी खुद आयुक्त शेखर सिंह प्रयत्नशील आहेत.
सिक्कीमने राबवलेल्या या सर्व योजना पिंपरी चिंचवड शहरात देखील प्रभावीपणे राबवल्या जाव्यात आणि पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त व्हावे यासाठी आता पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाने पुढाकार घेतला असून सिक्कीमच्या या योजनांची सविस्तर माहिती पत्रकारांना व्हावी तसेच केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणविषयक जनजागृतीपर उपक्रमासाठी हातभार लागावा या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील पत्रकारांसाठी सिक्कीम राज्याचा अभ्यास दौरा आयोजित करण्याची मागणी महापालिका आयुक्त व प्रशासक श्री शेखर सिंह यांच्याकडे केली असून दौऱ्याचे महत्व लक्षात घेऊन आयुक्त सिंह यांनी देखील पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या या मागणीस तत्वतः मान्यता दिली आहे.
तसे पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्लॅस्टिक मुक्त शहरासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. अनेक प्रयत्न करून ही प्रशासनाला हवे तेवढे यश आले नाही. आजही शहरात प्लॅस्टिक चा वापर सर्रासपणे चालू आहे. पिंपरी चिंचवड किंवा कोणतेही शहर प्लॅस्टिकमुक्त किंवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुनियोजित आणि योजनाबद्ध कार्यक्रम होणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. आता अशा योजनांचे आदर्श उदाहरण सिक्कीम असून त्या योजना आपल्याकडे कशा राबवता येतील यावर अभ्यास होणे आणि ते नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे मत पत्रकारांकडून व्यक्त होत आहे.
शहरे ही लोकांसाठी आहेत, स्वत:च्या शहराची रचना आणि विकास करताना नागरिकांचा सहभाग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लोकांपर्यंत सरकारी उपक्रमांबाबत जास्तीत जास्त अधिकृत माहिती पोहोचावी तसेच लोकांमध्ये नैसर्गिक पर्यावरण आणि प्लास्टिक वापराबाबत जागरूकता विविध प्रसारमाध्यमांद्वारे व्हावी यासाठी हा अभ्यासदौरा महत्वाचा ठरणार आहे.
या दौऱ्याच्या माध्यमातून सिक्कीम राज्यातील अधिकाऱ्यांनी पर्यावरणासाठी केलेल्या आदर्शवत कार्याची सविस्तर माहिती पत्रकारांना मिळेल. सिक्कीम प्रशासनाने राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांची माहिती घेऊन ही माहिती पत्रकार माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवतील आणि ‘प्लॅस्टिकमुक्त पिंपरी चिंचवड शहरा’च्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान देतील त्यामुळे आयुक्तांनी शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या सिक्कीमच्या दौऱ्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी वरिष्ठ पत्रकार आणि पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे अनेक अभ्यास दौरे आयोजित केले जातात आणि हे दौरे नेहमीच शहराच्या हिताचे ठरलेले आहेत. माध्यमे हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून प्रशासन आणि नागरिकांमधला महत्त्वाचा दुवा आहेत हे पिंपरी चिंचवड शहरातील माध्यमांनी दाखवून दिले आहे .अशी कौतुकाची थाप नागरिकांद्वारे अनेकदा दिली गेलेली आहे.